Pimpri : जलतरण तलावाच्या प्रवेशद्वार छताचे प्लॅस्टर कोसळले

पिंपळे गुरव : महापालिकेच्या जुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाच्या प्रवेशद्वारावरील छताचा प्लॅस्टर केलेला सिमेंटच्या थराचा काही भाग अचानक रविवारी (दि.9) रात्री आठ वाजताच्या सुमारास कोसळला. यावेळी येथील परिसरात अल्पवयीन मुले खेळत होती. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
करोना काळात 16 मार्च 2020 पासून चार वर्ष जुनी सांगवी येथील नूतनीकरणाच्या कामासाठी तलाव पासून बंद होता. तलावाच्या नूतनीकरणासाठी सुरवातीला तब्बल 3 कोटी 98 लाख खर्च करण्यात आला. करोनानंतर त्यात आणखी काही भर घालून कामे गतीने करण्यात आली.
नूतनीकरण झालेल्या तलावाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2024 ला उद्घाटनही करण्यात आले. उद्घाटनाच्या घाई गडबडीत शेवटच्या टप्प्यात महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमातून येथील जलतरण तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. याचे एकाच वर्षात उदाहरण रविवारी रात्री पहावयास मिळाले.
चक्क स्लॅबच्या छताचा प्लास्टर केलेला सिमेंटचा थर अचानक कोसळला. इतकेच नव्हे तर जलतरण तलाव परिसरात अर्धवट कॉलम असलेल्या कॉलमला पीओपीचे आवरण लावून झाकले होते. त्याचे देखील तुकडे होऊन छिद्र पडल्याचे पहावयास मिळत आहे. अवघ्या एक वर्षात अशी परिस्िथती झाल्याने याठिकाणी येणारे जलतरणपटू, नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
या भागाची पाहणी केली आहे. प्रवेशद्वाराच्या आत व बाहेरील भागात स्लॅबला प्लास्टर केलेला थर कोसळून पडल्याचे दिसून आले. तत्काळ मी संबंधितांना याबाबत माहिती देऊन स्वच्छता करून घेतली. लवकरच पुन्हा योग्यरित्या प्लास्टर करून घेण्यात येईल.
– राजश्री सातळीकर,
क्रीडा विभाग, महापालिका





