भारतासोबतचा संघर्ष महागात पडणार ! मोहम्मद युनूस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव ?; देशात निदर्शने तीव्र

Mohammed Yunus Resigns । बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पद सोडल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे नेतृत्व केले. त्यांनी देशात सुधारणा घडवून आणण्याचे आणि त्याला स्थिरतेच्या मार्गावर आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन देऊनही त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याकांवरील, विशेषतः हिंदूंवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याचे दिसत आहे.
अंतरिम सरकार अस्तित्वात येऊनही देशातील परिस्थितीत काहीही बदल झाला नसल्याचा आरोप करत पंतप्रधान मोहम्मद युनूसच्या राजीनाम्याची मागणी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या एका वरिष्ठ नेत्याने केली आहे, जे अंतरिम सरकारच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एकीकडे, मोहम्मद युनूस भारताशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्याठिकाणची नेतेही त्यांच्या धोरणांवर खूश दिसत नाहीत.
बीएनपीचे सरचिटणीस फखरुल इस्लाम यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या निष्पक्षतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याविषयी त्यांनी, “सरकारने निष्पक्षपणे काम करावे आणि देशाला योग्य दिशेने नेले पाहिजे अशी अपेक्षा आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार निष्पक्षता राखण्यात अपयशी ठरले आहे, ज्यामुळे देशात अस्थिरता वाढली आहे,” असा आरोप त्यांनी केला. “जर अंतरिम सरकार निष्पक्ष राहू शकत नसेल तर निवडणुकीच्या वेळी तटस्थ सरकारची आवश्यकता असेल, “असे संकेत फखरुल इस्लाम यांनी दिले.
बांगलादेशात निवडणुकांची मागणी Mohammed Yunus Resigns ।
बीएनपीच्या सरचिटणीसांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला सुधारणा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची आणि बांगलादेशात निवडणुका घेण्याची मागणी केली. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या मदतीने स्थापन झालेले सरकारच देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकते आणि देशाला स्थिरतेकडे घेऊन जाऊ शकते.” असेही त्यांनी म्हटले. निवडणुका लांबवल्याने इतर शक्ती परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
फखरुल इस्लाम यांनी प्रश्न उपस्थित केला Mohammed Yunus Resigns ।
फखरुल इस्लाम यांनी प्रश्न उपस्थित केला की सुधारणा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ४-५ वर्षे वाट पाहणे योग्य ठरेल का? ते म्हणतात की, “जर निवडणुका लांबल्या तर जनता पुन्हा बराच काळ त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकते. शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकल्यापासून बांगलादेशात अस्थिरतेचे वातावरण आहे. अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांची मालमत्ता लुटली जात आहे आणि त्यांना असुरक्षित वाटत आहे. दरम्यान, पाकिस्तान बांगलादेशमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे देशात तणाव आणखी वाढला आहे.
निष्पक्ष निवडणुका हाच एकमेव उपाय
बांगलादेशातील सध्याच्या राजकीय संकट आणि अस्थिरतेच्या काळात, निष्पक्ष निवडणुका हाच एकमेव उपाय आहे जो देशाला स्थिरता आणि विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका वेळेवर आणि निष्पक्ष पद्धतीने होतील याची खात्री करावी. यामुळे बांगलादेशातील लोकांना त्यांचे लोकशाही हक्क परत मिळतील आणि देशाला स्थिर भविष्याकडे घेऊन जाता येईल.





