Mohammad Shami : मोहम्मद शमीला आयपीएलदरम्यान जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

Mohammad Shami Receives Death Threat : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आयपीएल २०२५ दरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याला मेलद्वारे ही धमकी मिळाली आहे. या प्रकरणात मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद हसीबने अमरोहा पोलिसांना माहिती दिली आहे आणि एफआयआर दाखल केला आहे. शमीच्या आधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गंभीर प्रकरणात आरोपीला अटक केली होती.
रविवारी आला धमकीचा मेल –
मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने या प्रकरणाची माहिती अमरोहाच्या पोलिस अधीक्षकांना देताना सांगितले की, रविवारी मेलद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या. राजपूत सिंधर नावाच्या मेल आयडीवरून शमीला एक मेल पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मेलमध्ये लिहिले होते की, ‘तुला जीवे मारेन. सरकार आमचे काहीही करू शकणार नाही.’ या मेलमध्ये १ कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. मात्र, शमीच्या भावाने तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
IPL 2025: Mohammad Shami Receives Death Threat Before Match Against Delhi Capitals
Before today’s IPL match between Sunrisers Hyderabad and Delhi Capitals, India’s star bowler Mohammad Shami receives a shocking death threat via email. His brother, Hasib, confirms the incident… https://t.co/wqLWMAVR4V
— Sayali Memane (@Anchor_Sayali) May 5, 2025
दुसरीकडे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खरं तर, गंभीरने सोशल मीडियावर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. धमकी देणारा आरोपी गुजरातचा रहिवासी होता. आरोपी हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. त्याची ओळख २१ वर्षीय जिग्नेश सिंग परमार अशी झाली होती.
हेही वाचा – ICC Annual Rankings : भारताचे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व कायम, कसोटीत फटका
आयपीएल २०२५ मध्ये मोहम्मद शमीची कामगिरी निराशाजनक –
आयपीएल २०२५ मध्ये शमीची कामगिरी खराब राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये त्याने हैदराबादसाठी फारसे काही केलेले नाही. तो संघासाठी महागडाही ठरला आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ५६.२ राहिली आहे, तर या स्टार गोलंदाजाने ११.२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ मध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, आयपीएल २०२३ मध्ये, त्याने त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित करताना २८ विकेट्सह पर्पल कॅप जिंकली होती.





