Amir Ashraf Fight : आमिरने डिवचलं अन् फहीमचा पारा चढला! अंपायरसमोरच एकमेकांना मारण्यासाठी धावले, पाहा VIDEO
Amir Ashraf Fight : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि अष्टपैलू फहीम अशरफ यांच्यात मैदानातच हाणामारी होण्याची वेळ आली होती.

Mohammad Amir Faheem Ashraf Fight Video PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) ११ व्या हंगामात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा मैदानातील वाद आणि राड्यांच्या चर्चाच अधिक रंगत आहेत. फखर झमान याच्यावर लागलेल्या बॉल टेम्परिंगच्या आरोपानंतर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि अष्टपैलू फहीम अशरफ यांच्यात मैदानातच हाणामारी होण्याची वेळ आली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर २३ एप्रिल रोजी रावळपिंडी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात ३४ वा सामना पार पडला. या सामन्यादरम्यान मैदानावर अत्यंत धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. इस्लामाबाद युनायटेडचा फलंदाज फहीम अशरफ आणि रावळपिंडीचा गोलंदाज मोहम्मद आमिर यांच्यात शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, फहीम चक्क आमिरला बॅटने मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला.
नेमकं प्रकरण काय?
🚨 HUGE FIGHT BETWEEN MOHAMMAD AMIR AND FAHEEM ASHRAF IN PSL..!!! 🤯
– Faheem Ashraf who is a cool minded guy lost his control after Amir gave him a send off.
– Amir is retired and his team is already out of PSL. Was this action necessary? pic.twitter.com/vRIEmijM4D
— Abdullah. (@Abdullahh_56) April 23, 2026
इस्लामाबादची फलंदाजी सुरू असताना ७९ धावांवर त्यांचे ५ गडी बाद झाले होते. त्यानंतर मैदानात आलेल्या फहीम अशरफने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ११ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर तो मोहम्मद आमिरच्या चेंडूवर बाद झाला. फहीम बाद झाल्यानंतर आमिरने त्याच्या जवळ जाऊन मोठ्या जोशात जल्लोष केला आणि त्याला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. आमिरचा हा ‘अग्रेसिव्ह’ अवतार पाहून फहीमचा संयम सुटला आणि तो हातातली बॅट आमिरच्या दिशेने उगारत त्याला मारण्यासाठी वेगाने पुढे सरसावला.
सहकाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला –
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रावळपिंडीच्या इतर खेळाडूंनी तातडीने हस्तक्षेप केला. एका खेळाडूने फहीम अशरफला धरून मागे खेचले, तर आमिर या काळातही फहीमला काही अपशब्द बोलताना दिसला. या सामन्यात रावळपिंडीने ६ गडी राखून विजय मिळवला असला, तरी त्यांच्यासाठी हा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. सलग ८ पराभवानंतर रावळपिंडीचा हा यंदाच्या मोसमातील पहिलाच विजय ठरला आहे. मात्र, विजयापेक्षा या ‘राड्यामुळेच’ पाकिस्तान क्रिकेटची जगभरात नाचक्की होत आहे.





