‘Modi Mission’ मधून उलगडणार पंतप्रधान मोदींचा जीवन प्रवास; नवीन पुस्तक येणार भेटीला

New book on Prime Minister Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित एक नवी पुस्तक लवकरच वाचकांसमोर येत आहे. या पुस्तकाचे नाव आहे ‘मोदीज मिशन’, आणि ते सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे.
रूपा पब्लिकेशन्स यांच्या वतीने प्रकाशित होणारे हे पुस्तक २४ ऑक्टोबर रोजी लोकार्पित होणार असून, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
हे पुस्तक पंतप्रधान मोदी यांच्या वडनगरमधील साध्या बालपणापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या असामान्य प्रवासाचे जिवंत चित्रण करते. कठीण अडथळ्यांना आणि असंख्य आव्हानांना तोंड देत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जागृतीचे माध्यम कसे बनवले, याचेही यात सविस्तर वर्णन आहे.
पुस्तकात काय आहे?
‘मोदीज मिशन’ या पुस्तकात लेखकाने पंतप्रधान मोदींबद्दल पसरवण्यात आलेल्या गैरसमज आणि अपप्रचाराचे खंडन केले आहे. बर्जिस देसाई यांनी मोदी यांच्या पारदर्शक आणि परिणामकारक शासनशैलीचा सखोल अभ्यास केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, कलम ३७० ची रद्दबातल, आणि भारताच्या सभ्यतागत गौरवाचे पुनर्स्थापन. या सर्व ऐतिहासिक निर्णयांच्या मागील मोदींच्या विचारसरणीचा अभ्यास पुस्तकात करण्यात आला आहे.
या ग्रंथात मोदी यांच्या बालपण आणि तरुणपणातील अनुभवांनी त्यांच्या सामाजिक-आर्थिक दृष्टिकोनावर आणि प्रशासन तत्त्वज्ञानावर कसा प्रभाव टाकला, यावर विशेष भर दिला आहे.
लेखक बर्जिस देसाई कोण आहेत?
बर्जिस देसाई हे मुंबईस्थित सुप्रसिद्ध वकील आणि लेखक आहेत. ते एका अग्रगण्य कायदा फर्मचे मॅनेजिंग पार्टनर म्हणून निवृत्त झाले असून, पूर्वी ते एका प्रमुख गुजराती दैनिकाचे पत्रकारही राहिले आहेत. त्यांनी ‘Oh! Those Parsis’ आणि ‘The Bawaji’ यांसारख्या पारशी संस्कृतीवर आधारित लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत.
उद्योगजगताची प्रशंसा :
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या पुस्तकाचे कौतुक करताना म्हटले आहे, “पंतप्रधान मोदी हे २१व्या शतकातील सर्वाधिक जवळून पाहिले गेलेले नेते आहेत. देशप्रेमाने प्रेरित त्यांच्या अथक प्रयत्नांनी भारताने जगात स्वतःचे स्थान अधिक उंचावले आहे, आणि हे पुस्तक त्याच प्रवासाचा सखोल अभ्यास करते.” असं त्यांनी म्हंटलं आहे.





