Rahul Gandhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोनाकाळातील दु:खद घटनांचा विसर पडला आहे. किती लोक मृत्युमुखी पडले, जनतेला किती त्रास झाला हे ते विसरले आहेत, असे टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडले. मोदींनी संसदेत पश्चिम आशियातील युद्धावरून निर्माण झालेल्या स्थितीबाबत निवेदन दिले. भारताने एकजुटीने करोना संकटावर विजय मिळवला. त्याच धैर्याने आताच्या संकटावरही मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावर राहुल यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना उपरोधिक प्रतिक्रिया दिली. युद्धामुळे उद्भवलेली जागतिक आव्हाने दीर्घकाळ टिकण्याची शक्यता मोदींनी वर्तवली. त्याचा संदर्भ देऊन राहुल म्हणाले, आता केवळ सुरूवात आहे. गॅस, पेट्रोल, खतांविषयी समस्या निर्माण होतील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका-इस्त्रायल विरूद्ध इराण अशा संघर्षात तोडगा काढण्याच्या उद्देशातून काही देश मध्यस्थी करत आहेत. त्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याविषयीच्या प्रश्नावर राहुल उत्तरले, आपले परराष्ट्र धोरण मोदींचे व्यक्तिगत परराष्ट्र धोरण बनले आहे. त्याचे परिणाम आपण पाहू शकतो. प्रत्येक जण त्याकडे जागतिक विनोद म्हणून पाहत आहे. मोदी काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत; ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकेपणाने जाणतात. त्यामुळे पंतप्रधान तडजोड करत असतील; तर आपल्या परराष्ट्र धोरणाशीही तडजोड होते. ते अगदी स्वाभाविक आहे. अमेरिका आणि इस्त्रायल जे सांगतील; तेच मोदी करतील. ते देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करू शकणार नाहीत.