Rahul Gandhi : “निवडणुकांनंतर पेट्रोल, डीझेलचे दरही वाढवले जातील” – राहुल गांधी
छोट्या आणि मध्यम उद्योगांवर सर्वांधिक प्रतिकूल परिणाम होईल. दैनंदिन गरजेच्या वस्तू महागतील. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे पैसे आणखी वेगाने बाहेर जातील.

Rahul Gandhi – देशातील सध्याची आर्थिक स्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दिशेचा, रणनीतीचा मोदी सरकारकडे अभाव आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सोडले. पुढील महिन्यातील विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल, डीझेल आणि गॅसचे दरही वाढवले जातील, असे भाकितही त्यांनी केले.
पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा भारतात जाणवू लागल्या आहेत. त्यातून गॅस सिलिंडरचा पेच उद्भवला आहे. रूपयाच्या मुल्याची घसरण सुरू आहे. नुकतीच प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डीझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. त्यावरून विरोधी पक्षांनी आणि प्रामुख्याने कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचे सत्र आरंभले आहे. ते सत्र राहुल यांनी सोशल मीडियावरून भाष्य करत पुढे नेले.
डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याची वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरू आहे. औद्योगिक इंधनाच्या किमती वेगाने वाढत आहेत. त्यातून आगामी काळात महागाई वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्व काही सुरळित असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. प्रत्यक्षात उत्पादन आणि वाहतूक आणखी खर्चिक बनेल.
छोट्या आणि मध्यम उद्योगांवर सर्वांधिक प्रतिकूल परिणाम होईल. दैनंदिन गरजेच्या वस्तू महागतील. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे पैसे आणखी वेगाने बाहेर जातील. त्यामुळे शेअर बाजारावरील दबाव वाढेल. म्हणजेच, प्रत्येक कुटूंबाच्या खिशावर थेट परिणाम निश्चित आहे, असा इशारा राहुल यांनी दिला.






