पुणे – कौटुंबिक छळासह खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावयासह आठ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यापूर्वीच गायकवाड कुटुंबावर “मोक्का’नुसार कारवाई केली आहे, त्यापाठोपाठ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही त्यांच्याविरुद्ध “मोक्का’चा बडगा उगारला.
नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, त्याची पत्नी, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. एनएसजी हाऊस, औंध), दीपक निवृत्ती गवारे (वय 45, दोघेही रा. शिवाजीनगर), त्याची पत्नी, राजूदादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.विशालनगर, पिंपळे निलख), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा. विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
संशयितांनी आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन, वसुलीसाठी गोळीबार, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. व्याजाच्या पैशांतूनच जागा, वाहने बळकावून संपत्ती जमविल्याचा पोलिसांना संशय होता. नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व साथीदारांनी मागील काही वर्षांत खुनाचा प्रयत्न, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, दुखापत करणे, कट रचून फसविणे, अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून विविध गुन्हे केले आहेत.
गरजू व्यक्तींना व्याजाने पैसे देत मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. त्याच्याविरुद्ध “मोक्का’अंगर्तत कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी मंजुरी दिली.
या प्रकरणाचा तपास विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत. चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.