Pune Crime : कुख्यात बंटी पवार टोळीवर मोक्का कारवाई

पुणे – सिंहगड रस्ता परिसरात दहशत माजविणाजया कुख्यात बंटी पवार टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.
महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (36 ), शुभम बबन वाघमारे (26 ), प्रवीण बाळासाहेब ढाकणे (19 , तिघे रा. वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बंटी पवार टोळीविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजविणे, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
2015 मध्ये बंटी पवार आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहातून 2019 मध्ये जामीन मिळवून बाहेर पडला. पवार आणि त्याचे साथीदारांनी पुन्हा गुन्हे करण्यास सुरूवात केली. त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 20 जून रोजी पवार आणि साथीदार वाघमारे यांना अमली पदार्थ विक्री प्रकरणात सिंहगड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता. तपासात पवारचा साथीदार ढाकणे याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
बंटी पवार आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजूर दिली. पोलीस निरीक्षक घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, कुलदीप संकपाळ, प्रमोद कळमकर, मोहन भुरूक आदींनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 37 गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.





