Pune Crime: अवघ्या दोन तासांत मोबाईल स्नॅचरला बेड्या; सव्वा लाखांचा आयफोन आणि चोरीची दुचाकी जप्त
Pune Crime: कॅबची प्रतीक्षा करत असलेल्या तरूणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने आयफोन १७ प्रो जबरदस्तीने हिसकावून पळ काढला

पुणे : संचेती चौक परिसरात ऑटोची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाच्या हातातील सुमारे १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा आयफोन १७ प्रो जबरदस्तीने हिसकावून पळालेल्या सराईत चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. आरोपीकडून चोरीस गेलेला आयफोन तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील चोरीची दुचाकी असा एकूण सुमारे २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संचेती चौक येथे फिर्यादी ऑटो कॅबची प्रतीक्षा करत असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या हातातील आयफोन १७ प्रो जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्या सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार महावीर वलटे, पोलीस नाईक दिपक रोमाडे यांना आरोपी वेताळबाबा चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश सुरेश वाघीरे ( २१, रा. दळवी हॉस्पिटलजवळ, शिवाजीनगर, पुणे) असे आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी ही चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचेही उघड झाले. तसेच त्याच्यावर विश्रामबाग, भारती विद्यापीठ आणि चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच , पोलीस हवालदार भाऊ चव्हाण,राजकिरण पवार,महावीर वलटे, इसाक पठाण, पोलीस नाईक दिपक रोमाडे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे, पोलीस अंमलदार श्रीकांत मखरे यांनी केली आहे.





