महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाइल कॅमेरा; सूरतच्या रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार
सूरत – सुरतच्या के’ज चारकोल रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला वॉशरूममध्ये छुपा मोबाइल कॅमेरा लपवून ठेवला असल्याचे आढळून आले. महिलेने ताबडतोब हॉटेल व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तेथील एका सफाई कामगाराला अटक केली आहे तो मुळचा झारखंड येथील रहिवासी आहे. या घटनेने महिलांची सुरक्षा आणि गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
डीसीपी विजय सिंह गुर्जर यांनी एका निवेदनात सांगितले की, महिलेच्या तक्रारीनंतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात आरोपी सुरेंद्र राणा महिलांच्या शौचालयातून जाताना आणि बाहेर पडताना दिसला. या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले.
ज्या फोनवरून रेकॉर्डिंग करण्यात आले त्या फोनमध्ये सिम कार्ड नव्हते जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर तो पकडला जाऊ नये. दुसऱ्या फोनमध्ये सिम कार्ड होते आणि त्याच्या गुगल हिस्ट्रीमध्ये पॉर्न साइट्स शोधण्यात आल्या. १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी बनवलेले आणखी चार व्हिडिओ देखील या फोनमधून जप्त करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी सुमारे दोन वर्षांपासून या रेस्टॉरंटमध्ये क्लीनर म्हणून काम करत होता. तो झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की तो अनेकदा पॉर्न पाहत असे, त्यामुळे त्याच्या मनात विकृत विचार येऊ लागले आणि त्याने हे पाऊल उचलले.
पोलिसांनी त्याच्या घरातून स्पाय कॅमेऱ्यांचा एक बॉक्स देखील जप्त केला आहे. हॉटेलमधील सुमारे ४० पुरुष कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपीच्या जवळच्या लोकांचे मोबाइल फोन देखील तपासात आहेत.





