Nasarapur : खड्डेमय रस्त्यांविरोधात मनसेचा अनोखा निषेध! चेलाडी ते वेल्हे मार्गावरील खड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन

नसरापूर : राजगड–वेल्हे तालुक्यातील चेलाडी ते वेल्हे हा प्रमुख मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरला आहे. रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेक तरुणांचा मृत्यू झाला असून अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. तरीसुद्धा शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी मार्गासनी येथे एका तरुणाचा खड्ड्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ‘खड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन’ करण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे.
या आंदोलनाची माहिती देताना मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर म्हणाले की, “राजगड–वेल्हे तालुक्यातील नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात. हा रस्ता म्हणजे शासन आणि PWD च्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा लढा उभारला जात आहे. शासनाला जागे करण्यासाठी व नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे.”
मनसेचे मुळशी तालुका अध्यक्ष धनंजय टेमघरे यांनी सांगितले की, “तालुक्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल.” राजगड तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे यांनी स्पष्ट केले की, “स्वराज्याची राजधानी असलेला राजगड आज मागास ठरत आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही.” सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष विलास बापू बोरगे म्हणाले, “रोजगार, दळणवळण आणि उद्योगविकासाशिवाय तालुक्याचे भविष्य बदलणार नाही. यासाठी आम्ही लढा उभारणार आहोत.” तर भोर शहराध्यक्ष शशिकांत वाघ यांनी सांगितले की, “राजगड–वेल्हे तालुका विकासाच्या वाटेवर यावा यासाठी भोर शहरातील प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे.”
या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर, सहकार सेल जिल्हाध्यक्ष विलास बापू बोरगे, राजगड तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, सहकार सेना तालुका अध्यक्ष संतोष चोरघे, कामगार सेना माजी अध्यक्ष मिथुन चोरघे, युवा नेते संग्राम दसवडकर, माजी सरपंच पांडुरंग पिलाणे, तसेच अशोक चोरघे, केतन शिळीमकर, अनिकेत व्यवहारे यांच्यासह मनसे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मनसेने आखलेले हे आंदोलन सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरत आहे. खड्डेमय रस्त्यांवरील जनआक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी ही लढाई उभारण्यात आली आहे.





