Crime News : पाइपलाइनचा वाद, थेट जीवे मारण्याची धमकी; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Crime News : या जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्या शेतातील पाण्याची पाइपलाइन तोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

न्हावरे :पिंपळसुटी (ता.शिरुर) येथे शेतातील पाण्याची पाइपलाइन जेसीबीच्या साह्याने तोडल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, महिलांसह अन्य व्यक्तींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी सुधाकर दत्तात्रय मोरे, संग्राम सुधाकर मोरे, सुनिता ऊर्फ सुमिता सुधाकर मोरे, सर्व रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे आणि पंकाबाई संभाजी सोनवणे, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कमल मच्छिंद्र भोसले (वय ५०, व्यवसाय शेती, रा. पिंपळसुटी) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ९ जुलै २०२६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळसुटी गावच्या हद्दीतील शेतात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल भोसले या त्यांचा मुलगा अक्षय याच्यासोबत शेतात काम करीत होत्या. त्यावेळी शेजारील शेतजमीन असलेले शेजारी जेसीबी मशीन घेऊन त्यांच्या शेताजवळ आले. या जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्या शेतातील पाण्याची पाइपलाइन तोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
“आमची पाइपलाइन तोडू नका,” असे सांगितल्यानंतर संबंधितांनी कमल भोसले आणि त्यांचा मुलगा अक्षय यांना लाकडी काठीने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत अक्षय भोसले जखमी झाला.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी कमल भोसले यांचा लहान मुलगा शुभम आणि सासू पुतळाबाई घटनास्थळी आले असता, त्यांनाही खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी शुभमच्या उजव्या खांद्यावर चावा घेऊन दुखापत करण्यात आली. तसेच सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर घटनेनंतर कमल भोसले यांनी शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.





