Pimpri : मनसे कायदा आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा राजकीय प्रवेश भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वात पार पडला. मनसेच्या जनहित व विधी कायदा सेलच्या शहराध्यक्षा ॲड. प्रीतिसिंह परदेशी यांनी संपूर्ण कायदा सेलच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, शहरातील पक्षाची कायदा आघाडी अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.
या प्रवेश सोहळ्यात ॲड. श्रीधर यलमार, ॲड. रुचिरा कर्वे, ॲड. विद्या राठोड, ॲड. श्रुती जोगळेकर, ॲड. अमोल वाघ आणि ॲड. रोहन देशपांडे यांचाही समावेश होता. यावेळी भावना व्यक्त करताना ॲड. प्रीतिसिंह परदेशी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम पावले टाकली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या निर्णायक कारवाया आणि गेल्या ११ वर्षातील प्रगतीमुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या ऐतिहासिक प्रवेश प्रसंगी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा ढोरे, पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, सदाशिव खाडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शैला मोळक, सुजाता पालांडे, मनोज ब्राह्मणकर, अजित कुलथे, कैलास सानप, ॲड. गोरक्षनाथ झोळ, शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, प्रवीण कुंजीर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील भाजप अधिक बळकट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.





