पिंपरी | पालिकेतील नूतनीकरणाचे काम मनसेने पाडले बंद

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलनिःसरण विभागातील वेगवेगळ्या केबिनचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी स्थापत्य विभागाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले.
हे काम सुरु करणा-या संबंधित अधिका-यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे शहर सचिव रुपेश पटेकर यांनी केली.
महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर पाणी पुरवठा आणि जलनिःसारण विभाग आहे. या विभागात पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची केबिन आहे.
या विभागाची तोडफोड करुन नूतनीकरण करण्यात येत आहे. प्लायवूडचा उपयोग करुन केबिन तयार केल्या जात आहेत.
याकरिता या विभागातील पूर्वीचे लाखो रुपयांचे फर्निचर तोडण्यात आले आहे. या कामामुळे या विभागातील लिपिक, शिपाई व इतर कर्मचा-यांना बसण्यास सध्या जागा उपलब्ध नाही. तथापि, हा प्रकार बेकायदेशीर पध्दतीने सुरु असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
हे काम करण्यासाठी स्थापत्य विभागाची परवानगी आवश्यक आहे. परंतु, शहर अभियंता मकरंद निकम यांनी परवानगी दिली नाही.
तरी अ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागातील अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी बेकायदेशीर पध्दतीने हे काम हाती घेतल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले. दरम्यान, हे काम हाती घेणा-या अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रुपेश पटेकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.





