MLA Mauli Katke : आमदार कटके यांच्या उपोषणाने प्रशासनाला जाग! वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर मंजुरी
MLA Mauli Katke : वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिक होते हैराण; समन्वय अभावामुळे रखडलेल्या कामाला अखेर मिळाला ग्रीन सिग्नल.

MLA Mauli Katke – वाघोली ते आव्हाळवाडी प्रजिमा-56 रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली आबा कटके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून शासनाने संबंधित कामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आमदार कटके यांनी जाहीर केलेले उपोषण स्थगित करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांनी शासन, पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. ऑगस्ट 2025 पासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि पत्रव्यवहार होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.
संबंधित विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडल्याचे चित्र दिसत होते. नागरिकांच्या प्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आमदार माऊली आबा कटके यांनी 8 जून 2026 रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाची घोषणा होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिली आणि रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला.
या निर्णयामुळे वाघोली, आव्हाळवाडी आणि परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आमदार कटके यांच्या उपोषणाची आणि त्यानंतर झालेल्या निर्णयाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
“गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा लागला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कामास मंजुरी दिली, याचे समाधान आहे. मात्र मंजुरी मिळणे पुरेसे नसून प्रत्यक्ष काम तातडीने सुरू होऊन निर्धारित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. नागरिकांच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी माझा संघर्ष यापुढेही सुरू राहील.”
– माऊली आबा कटके, आमदार, शिरूर-हवेली





