Contaminated Water : पिवळसर पाणी नागरिक कसे प्यायचे? पालिकेच्या अजब दाव्यानंतर आंदोलनाचा इशारा
Contaminated Water : धानोरी, लोहगाव, नागपूरचाळ आणि खराडी परिसरात दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर; दोन दिवसांत तोडगा न निघल्यास आंदोलनाचा पवित्रा.

Contaminated Water – पिवळसर पाणी येत असल्याने धानोरी, लोहगाव, नागपूरचाळ आणि खराडीचे नागरिक आक्रमक झाले असून, येत्या दोन दिवसांत जर ही परिस्थिती बदलली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. नगरसेविका नंदिनी धेंडे, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला.
ते म्हणाले, गेल्या २९-२२ दिवसांपासून हा त्रास प्रभाग एक ते चारमधील नागरिक सहन करत आहेत. याविषयी पाणीपुरवठा, विद्युत विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. या भागाला भामा आसखेड येथून पाणी मिळते. धरणसाठा कमी झाला असून, शेवाळयुक्त पाणी येत असल्याचे प्रशासन सांगते. जेथे पाणी शुद्ध होते, तेथे पाण्याचा रंग सामान्य आहे. पुढे वितरण झाल्यावर पाणी पिवळसर येत आहे.
या पाण्याची चाचणी केली असता ते पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा चाचणीनंतर पालिकेच्या प्रयोग शाळेने दिला आहे. पिवळसर पाणी नागरिकांनी कसे प्यायचे हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. दोन दिवसांत हा प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
खरे कारण लपवत आहे
पाण्याला अतिशय दुर्गंधी येत आहे. पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळले असते तर वेगळी बाब म्हणता आली असती. पिवळसर पाण्याचे खरे कारण प्रशासन लपवत आहे. प्रयोगशाळेच्या अहवालातूनही नागरिकांना स्पष्ट माहिती दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर पाण्याचे नमुने खासगी प्रयोगशाळेतून तपासून घेणार असल्याची माहिती धेंडे यांनी दिली.




