Mahabaleshwar News : जखम मांडीला अन् तूप शेंडीला! महाबळेश्वरच्या रस्ते कामाचा कारभार पाहून कपाळावर हात माराल
Mahabaleshwar News : सुरूर-महाबळेश्वर रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली; आगामी पावसाळ्यात व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता.

Mahabaleshwar News – सुरूर-महाबळेश्वर रस्त्याचे काम सध्या विविध कारणांमुळे राज्यभर चर्चेत आले आहे. मात्र, हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावरून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पांगारे हद्दीपासून ते अंजुमन हायस्कूलपर्यंतच्या टप्प्यात दर्जाबाबत आधीच वाद असताना, आता चांगल्या रस्त्यावर पुन्हा डांबर ओतण्याचा ‘विचित्र’ प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या या मार्गावर काही ठिकाणी रस्ता सुस्थितीत असताना, एकही खड्डा नसताना त्यावर डांबराचा थर चढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वास्तविक, याच परिसरातील अनेक ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जिथे खरोखर रस्ते दुरुस्तीची गरज आहे, तिथे दुर्लक्ष करायचे आणि जे रस्ते सुस्थितीत आहेत, तिथेच पुन्हा खर्च करायचा, असा हा प्रकार ‘जखम मांडीला आणि तूप शेंडीला’ असा असल्याचा टोला स्थानिकांनी लगावला आहे.
या डांबरीकरणामुळे रस्त्याची जाडी अनावश्यक वाढत असून घरे आणि दुकाने जाणार खड्ड्यात जाणार आहेत. याचा थेट परिणाम रस्त्याशेजारील बांधकामांवर होत आहे. रस्त्याची उंची वाढल्यामुळे बाजूची घरे आणि दुकाने आता खोलवर (खड्ड्यात) गेल्यासारखी दिसत आहेत. आगामी पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट दुकानांमध्ये आणि घरात शिरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. जुना रस्ता खरवडून न काढताच त्यावर नवा थर टाकल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.
सरकारी पैशांची ही उधळपट्टी कशासाठी?
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण योग्य दर्जाचे आहे की नाही, हा वाद आधीच सुरू होता. त्यात आता या ‘डांबरा’ची भर पडली आहे. “ज्या गावांना जोडणारे रस्ते खराब आहेत तिथे निधी का वापरला जात नाही? सरकारी पैशांची ही उधळपट्टी कशासाठी?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन जिथे गरज आहे तिथेच दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.





