Khalapur: पूरग्रस्त भागात आमदार महेंद्र थोरवे यांची पाहणी
Mahendra Thorve : नागरिकांच्या पाठीशी शासन ठाम असल्याची ग्वाही

खालापूर – खालापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांची आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी केली. या संकटाचा सामना शासन आणि प्रशासन एकत्रितपणे करत असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माडप मुठा (ठाकूरवाडी) येथे डोंगराचा काही भाग खचल्याने ५२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या कुटुंबांची एक्झर्बिया येथील बंद इमारतीत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार थोरवे यांनी स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी ठाकूरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे तसेच भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुसळधार पावसामुळे ठाणेन्हावे आणि जांभिवली गावांना जोडणारे पूल वाहून गेले आहेत. आमदार थोरवे यांनी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पुलांच्या पुनर्बांधणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जांभिवली येथील श्री समर्थ बैठक सभागृहात नदीचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली. बाधित नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणी दौऱ्यात तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, तालुकाप्रमुख संदेश पाटील, युवासेना अधिकारी प्रमोद शिर्के, रोहित विचारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.





