Pune District : धोकादायक पुलावरून शिक्षणाची जीवघेणी वाट
Pune District : तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर बायपास म्हणूनही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरदार दररोज या पुलावरून प्रवास करतात.

तळेगाव ढमढेरे : एका वडिलांच्या खांद्यावर बसलेली चिमुकली… एका हातात तिचे दप्तर… तर पायाखाली वेगाने वाहणारे पुराचे पाणी, हा जीवघेणा थरारक प्रवास कोणत्या दुर्गम, डोंगरी भागातील नाही. प्रगत आणि पुढारलेल्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ही धोकादायक वहिवाट आहे. या प्रसंगाने प्रशासनाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
श्रीनाथ मंदिराजवळील वेळनदीवरील पुलावर दिसलेले हे दृश्य केवळ एका कुटुंबाची व्यथा नाही, तर सुरक्षित पुलाअभावी दर पावसाळ्यात जीव धोक्यात घालणाऱ्या शेकडो नागरिकांच्या आयुष्याचे वास्तव आहे. मंदिराजवळील वेळनदीवरील हा पूल पांढरी वस्तीमार्गे शिक्रापूरला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर बायपास म्हणूनही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरदार दररोज या पुलावरून प्रवास करतात. मात्र, पुलाची उंची कमी असल्यामुळे वेळनदीच्या पाण्याची पातळी थोडी वाढली की पूल पाण्याखाली जातो. हा दरवर्षी पावसाळ्यातील प्रवास मृत्यूला आव्हान आणि निमंत्रण देणारा ठरत आहे. मात्र, राजकारणात या गावातील नेत्यांचा शब्द खाली पडत नाही.
राजकीय ताकद घटली?
गावाला राजकीय, ऐतिहासिक, अध्यात्मिक वलय असलेल्या गावात पुलाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे अनेक वर्षांपासूनचे वास्तव समोर आले. शाळेची घंटा चुकू नये, शिक्षण खंडित होऊ नये म्हणून पालक आपल्या चिमुकल्या मुलांना खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती असते; पण मुलांच्या भविष्यापुढे मृत्यूची भीती मागे पडते. ग्रामस्थांनी अनेकदा नवीन, उंच पुलाची मागणी करीत निवेदने दिली. पाठपुरावा केला; मात्र, अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात अशी कसरत करावी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही वर्षांत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्या सदनिका, शैक्षणिक गरजा, वाढती वाहतूक आणि बायपास मार्ग म्हणून असलेले महत्त्व लक्षात घेता हा पूल आता अपुरा ठरत आहे. पूल पाण्याखाली गेल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णवाहिका, दूधवाहने, शेतमाल वाहतूक, दैनंदिन जीवनही विस्कळीत होत आहे. बापलेकीचा हा फोटो केवळ एक क्षणचित्र नाही; तो विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे करणारा पुरावा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणताही विकास मोठा असू शकत नाही. त्यामुळे श्रीनाथ मंदिराजवळील वेळनदीवर तातडीने उंच, सुरक्षित, सर्व हंगामात वाहतुकीसाठी सक्षम असा नवीन पूल उभारावा, अशी मागणी नागरिक, पालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
.





