पिंपरी | राज्यस्तरिय परिषदेतून मंत्री सत्तारांनी घेतला काढता पाय

पिंपरी, (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकार्यांनी सांगताच पणन मंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला.
उपस्थित सभापतींनी पदाधिकार्यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला.
त्यामुळे एकच गोंधळ झाला. अब्दुल सत्तार यांचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी (दि.3) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
याशिवाय राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणार्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधला जाणार होता.
राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा,
पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.
पणन मंत्री अब्दुल सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड ते दोन तास उशिरा पोहोचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले.
बारा-एकच्या परवानग्यात आर्थिक व्यवहार होत आहेत. पणन मंडळाकडून पैसे घेतले जातात असे सांगत असताना मंत्री सत्तार चिडले. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका असे म्हणत माइकचा ताबा घेतला.
उपस्थित सभापतींनी सोमवंशी यांना बोलू देण्याची विनंती करताच मंत्री सत्तार यांनी मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे उपस्थित सभापती संतापले.
सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्तार यांचे पोस्टर फाडले. सत्तार यांच्या निषेधाचा ठराव केला. सत्तार यांच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
म्हणत परिषदेतून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. त्यांनतर सभागृहात गोंधळ सुरूच होता. सदस्यांकडून सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती.





