वाघोली – यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड झालेली आहे. त्यांचे बंधू प्रकाश जगताप यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या सभापतीपदी निवड झाली आहे. सहकार क्षेत्रात या दोन्ही बंधूंनी आपले वेगळेपण जपत आपली ओळख अधोरेखित केल्याने अष्टापुर (तालुका हवेली) या गावाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या सभापतीपदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वाघोलीकरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वाघोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, कमलबाग सोसायटीचे चेअरमन संतोष देशमुख, वाघोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्तात्रय कटके, सुनील कटके व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामभाऊ दाभाडे यांनी दोन्ही बंधूंनी सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत दोन्ही संस्था उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्खे बंधू वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे नेतृत्व करतात हा हवेली तालुक्यामधील दुर्मिळ योगायोग असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. प्रकाश जगताप यांच्या निवडीबद्दल माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, उद्योजक भारत सातव, सागर जाधव, प्रमोद भाडळे, लखन भाडळे, विनायक दाभाडे आदींनी अभिनंदन केले आहे.