छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा निकाल समोर येत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी प्रभाग १८ (अ) मधून दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या हर्षदा यांनी भाजपच्या मयुरी बर्थने यांचा पराभव करत शिरसाट यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दुसरीकडे, शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट देखील प्रभाग २९ (अ) मधून आघाडीवर आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी प्रभागात ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला राखला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांनी एमआयएमच्या उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. मागील वेळी झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढत खैरे यांनी हा विजय खेचून आणला. सर्वात लक्षवेधी लढत ‘गरम पाणी’ प्रभागात पाहायला मिळत आहे. माजी महापौर रशीद मामू यांना ठाकरे गटात उमेदवारी दिल्याने पक्षात अंतर्गत वाद उफाळला होता; मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार रशीद मामू हे एमआयएमच्या उमेदवाराला मागे टाकत आघाडीवर आहेत. सद्यस्थितीत भाजप आणि शिंदे गटात चुरस असून भाजप सर्वाधिक जागांसह पहिल्या तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे.