Sanjay Shirsat : सामाजिक खात्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला; मंत्री संजय शिरसाट यांचा पारा चढला

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. मात्र, हा हप्ता देण्यासाठी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राखीव असलेला 410 कोटी रुपयांचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा 336 कोटींचा निधी लाडक्या बहिणींकडे वळविण्यात आला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्याने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले आहेत. ते म्हणाले, या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही किंवा त्यात कपात करता येत नाही. परंतु अर्थ खात्याकडून आपले डोके जास्त चालवले जात आहे. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा, असा संताप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले, माध्यमांमधून मला माझ्या खात्याचे पैसे वर्ग केल्याची माहिती मिळाली. त्याची मला कल्पना नाही. माहिती नाही. परंतु सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करा. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, अर्थ विभागाकडून मनमानी सुरु आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही? माझे १५०० कोटींची देणी बाकी आहेत. ते वाढत आहेत. माझे पत्र देणे काम आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हे त्यांनी पाहावे. त्यांच्या निर्णय आणि सूचनांची मला कल्पना नाही. सामाजिक खात्याचा निधी वर्ग करता येत नाही, हा कायदा असताना अर्थ विभागातील काही महाभागांकडून हा प्रकार केला आहे. त्यांना असे वाटत की, निधी वळवता येते. कायद्यात पळवापळवी करून निधी घेणे चुकीचे आहे. हे पैसे दलीत भगिनींना दिले, असं म्हणता येत नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
राज्य सरकारने 2025-26 या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 22 हजार 658 कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी सहायक अनुदान म्हणून 3 हजार 960 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे.
तर आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3 हजार 420 कोटी रुपयांच्या अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. आता या दोन्ही विभागांतून दरमहा निधी वळता केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे, मात्र यावर आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Minister Sanjay Shirsat |





