Siddhant Shirsat : विवाहित महिलेसोबत लग्न, गर्भधारणा अन् धमकी…; मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध, बौद्ध पद्धतीने विवाह, गर्भधारणा आणि जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा दावा महिलेने कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय खळबळ उडाली असून सिद्धांत शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महिलेच्या आरोपानुसार, लग्नानंतर सिद्धांत यांचे वर्तन बदलले. धमकी, मानसिक व शारीरिक छळ, आणि पोलिसांकडून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. “तू पोलिसांत गेलीस तर आत्महत्या करेन आणि तुझे कुटुंब संपवीन,” अशी धमकी दिल्याचंही महिलेचं म्हणणं आहे. तसेच सिद्धांत यांनी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी, हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी देखील केली आहे.
नोटीसमध्ये नेमकं काय?
सिद्धांत शिरसाटांसोबत २०२८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. त्यामुळे सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनवर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केलं, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.
दरम्यान, लग्न झाल्यानंतर सिद्धांतच्या वर्तनात बदल झाला. सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे यापूर्वीचे विवाह संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर धमकी देण्यास सुरुवात केली. “तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करेन” अशा धमक्याही देण्यात आल्या, असे आरोप महिलेने केले आहेत.





