Pune District : विजयस्तंभच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद

वाघोली : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असून २ महिन्यात याबाबतच्या कामांना सुरुवात करण्यात होतील अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली.
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना शिरसाट म्हणाले की, दरवेळेला भीमा कोरेगाचा प्रश्न येतो. त्यावेळेस गेल्यावर पाहिलं तर त्या ठिकाणी एका वर्षाचा खर्च जवळपास १४ ते १५ कोटी रुपये एक, दोन ते तीन दिवसासाठी खर्च होतो. नंतर दुसऱ्या दिवशी नेस्तनाबूत होते. लागत म्हणून एक कायमस्वरूपी तिथे डेव्हलपमेंट झाले पाहिजे, त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचे काम दोन महिन्यांमध्ये चालू करतोय.
विजयस्तंभास मानवंदना देण्याकरिता महाराष्ट्रासह देशभरातून लाखो अनुयायी मानवंदना देण्यासाठी दि. १ जानेवारीला दरवर्षी येत असतात. यावेळी प्रशासनाकडून तात्पुरत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात असतानाच मंत्री शिरसाट यांच्या माहितीनंतर भीमसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून याचे स्वागत केले आहे.
विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात तसेच विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून याठिकाणी सर्वांना एकत्रित घेऊन उत्तम दर्जाची कामे होतील, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
-ज्ञानेश्वर कटके, आमदार.





