Minister Sanjay Shirsath: मंत्री संजय शिरसाठ अॅक्शन मोडमध्ये, पुण्यातील वस्तीगृहाची पाहणी;….अन्यथा कारवाईः शिरसाठ

पुणेः सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मुलींच्या वस्तीगृहाला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची बैठक घेत विद्यार्थ्यांना सुविधा न पुरवणाऱ्या ठेकेदारांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वसतीगृहाचा कंत्राटदार कोण आहे, तो कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे किंवा एखाद्या नेत्यासोबत त्याचा संबंध आहे, हे न पाहता थेट कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी बैठकीत दिली. छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहाची पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहाची पाहणी करणार असल्याची माहिती दिली. ते काल दि. २८ डिसेंबर रोजी पुण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहाला सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी अचानक भेट दिली. यामुळे येथील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी धांडल उडाली होती. येथील विद्यार्थ्यांनी शिरसाठ यांच्याकडे वस्तीगृहाची झालेली दुर्देशा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या असुविधांचा पाढाचा वाचला. यावेळी शिरसाठी यांनी वस्तीगृहाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि विद्यार्थ्यांना सर्व सोई मिळाव्यात, अशा सूचना दिल्या. यानंतर त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील वस्तीगृहाला भेट देत राज्यातील इतरही वस्तीगृहांची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
काही उणिवा, पण परिस्थिती समाधनकारकः शिरसाठ
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वस्तीगृहाची पाहणी केली असून येथील परिस्थिती समाधनकारक आहे. निश्चितच यामध्ये काही उणिवा आहेत. या उणिवा दूर करून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा द्याव्यात, अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. असे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.





