मंत्री गुलाबराव पाटील यांना 500 रुपयांचा दंड ! ‘जाणून घ्या’ नेमकं काय आहे प्रकरण

जळगाव – राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव न्यायालयाने 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टात गैरहजर राहिल्याने जिल्हा न्यायालयाने ही दंडात्मक कारवाई केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात खडसे आणि पाटील यांच्यातील वाद चांगलाच वाढत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यातच खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
मंगळवारी, या प्रकरणाच्या पहिल्याच दिवसाची सुनावणी जळगाव जिल्हा कोर्टात होणार होती. मात्र, पाटील यांनी आपल्या वकीलामार्फत सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. तसा रितसर अर्ज देखील त्यांनी न्यायालयात दाखल केला.
न्यायालयाने पाटील यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावत अर्ज मंजूर केला. तसेच पुढच्या सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबी देखील दिली.मंत्र्यांना सुनावण्यात आलेल्या दंडाची सध्या चांगलीच चर्चा आहे.





