मुंबई : शिवसेनेचे नेते माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी यापूर्वी तीन वेळा अशी घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा निवृत्तीचे सूर आवळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वारसदार कोण याची चर्चा रंगली आहे. दीपक केसरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून एका जाहीर कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. अचानक केलेल्या या घोषणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या प्रवक्ते पदाची कमान यशस्वी पेलली होती. शिवसेनेकडून (ठाकरे) होणाऱ्या आरोपांना अतिशय शांत पद्धतीने प्रत्युत्तर दिले. मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर त्यांना मंत्री पदाची पुन्हा संधी देण्यात आली नाही. अनेकदा याबाबत खंत बोलून दाखवल्यानंतर आता तर त्यांनी थेट निवृत्तीची घोषणा केली आहे. पण निवृत्तीची घोषणा करणारे दीपक केसरकर खरच निवृत्ती घेणार का? याचीही अनेकांना खात्री नाही. कारण याआधी देखील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरताना त्यांनी अशीच घोषणा केली होती. मात्र, आता ते या मतदार संघाचे चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. पण आता मागच्या निवडणुकीपेक्षा फरक असून आता त्यांची तब्बेत साथ देत नसल्याचेच सत्य आहे. यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असावी. मुलगी व जावई यांच्या नावाची चर्चा आता केसरकर यांनी निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांचा राजकीय वारसदार मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांच्या नावाची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजन तेली यांच्यासारख्या खमक्या नेत्याला टक्कर देण्यासाठी आक्रमक चेहरा हवा. सध्या आमदार निलेश राणे शिवसेनेत असल्यामुळे या ठिकाणी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे भाजपचे नेते नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांचे नाव देखील चर्चेत आहे.