Italy : चोरीला गेलेल्या कलाकृती इटली पोलिसांनी मिळवल्या; किंमत ऐकून उडतील होश !
रेनॉइर, सेझान आणि मातीस यांच्या लाखो युरो किमतीच्या तीन कलाकृती इटलीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.

Italy – रेनॉइर, सेझान आणि मातीस यांच्या लाखो युरो किमतीच्या तीन कलाकृती इटलीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. या तिन्ही कलाकृती या वर्षाच्या सुरुवातीला उत्तरेकडील पर्मा शहरातल्या एका संग्रहालयातून चोरीला गेल्या होत्या.
त्या परत मिळवण्यात इटली पोलिसांना यश आले असल्याचे इटालियन कॅराबिनेरी कला हस्तगत पथकाने एका निवेदनात म्हटले आहे. परंतु या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
जप्त करण्यात आलेल्या तीन कलाकृतींमध्ये ऑगस्ट रेन्वार यांचे फिश हे चित्र, पॉल सेझान यांचे पेन्सिल आणि वॉटरकलरमधील स्टिल लाइफ विथ चेरीज आणि हेन्री मातीस यांचे रंगीत ॲक्वाटींटमधील ओडालिस्क ऑन द टेरेस यांचा समावेश आहे.
सेझान यांच्या चित्राची किंमत ६० लाख युरो (७० लाख अमेरिकन डॉलर), रेन्वार यांच्या चित्राची किंमत ३० लाख युरो (३५ लाख अमेरिकन डॉलर) आणि मातीस यांच्या चित्राची किंमत २०,००० युरो (२३,००० अमेरिकन डॉलर) इतकी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्मापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मॅग्नानी रोक्का फाऊंडेशनवर २२-२३ मार्चच्या रात्री दरोडा पडला होता. त्यात चोरांनी अवघ्या ३ मिनिटांमध्ये या तीन मौल्यवान चित्रांची चोरी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यापूर्वी युरोपमधील प्रमुख संग्रहालयांमध्ये मोठ्या संख्येने चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातून फ्रेंच राजमुकुटाचे दागिने आणि ८८ दशलक्ष युरो किमतीच्या इतर वस्तूंच्या चोरीचा समावेश होता.





