Sonia Gandhi : वंदे मातरमच्या अपमान प्रकरणी सोनिया गांधींच्या विरोधात तक्रार दाखल
वंदे मातरमचा कथित अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sonia Gandhi – वंदे मातरमचा कथित अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार कर्नाटकातील मंगळूर येथे दाखल करण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. भाजप नेते विकास पुत्तूर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह उरवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
आपल्या तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की, सोनिया गांधी यांनी वंदे मातरम मध्येच थांबवण्यास सांगितले होते. संपूर्ण वंदे मातरम गाण्यास त्यांनी आक्षेप घेतला होता.
त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुत्तूर यांनी केली आहे. एफआयआर दाखल न केल्यास उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा पुत्तूर यांनी दिला.
राष्ट्रगीत किंवा इतर कोणत्याही चिन्हाचा अपमान झाल्यास कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडण्याची गरज नाही, असे पुत्तूर म्हणाले.






