स्पेनजवळ विस्थापितांची बोट बुडाली; ७ महिला आणि मुलींना जलसमाधी

बार्सिलोना (स्पेन) – स्पेनच्या कॅनरी आयलंड या बेटांवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेली शरणार्थ्यांची एक बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत ४ महिला आणि ३ मुली अशा ७ जणींना जलसमाधी मिळाली असल्याचे स्पेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बोट बुडाली तेंव्हा ही बोट किनाऱ्यापासून ६ मैल अंतरावर होती.
बोट बुडत असल्याची माहिती मिळाल्यावर स्पेनच्या सागरी सुरक्षा पथकाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. बोटीतील लहान मुलांना सर्वात आगोदर वाचवण्यात आले. कॅनरी बेटांमधील एल हिरो या बेटाजवळ ही दुर्घटना घडली.
या बोटीमधे असलेल्या प्रवाशांच्या हालचालींमुळे बोट उलटली. त्यामुळे प्रवासी पाण्यामध्ये पडले, असे बचाव पथकाने सांगितले.
या अपघातात चार महिला, एक किशोरवयीन मुलगी आणि दोन लहान मुलींचा मृत्यू झाला, असे कॅनरी बेटांच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले.
त्यापैकी एक मुलगी बचाव पथकाला सापडली. या लहान बोटीमध्ये १०० हून अधिक लोक दिसत होते. स्पॅनिश बचावकर्ते आणि रेड क्रॉसच्या सदस्यांनी लोकांना पाण्यातून बाहेर काढले, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीजवळ स्पेनची वसाहत असलेली बेटे आहेत. अत्यंत तकलादू आणि कमकुवत रबरी बोटींच्या मदतीने शरणार्थी या बेटांवर जाण्याचा धोकादायक प्रवास नेहमी करत असतात. युरोपात पोचण्यासाठीच्या या धोकादायक प्रवासादरम्यान आतापर्यंत हजारो शरणार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.





