nagar | महिला सरपंचाच्या घरावर मध्यरात्री हल्ला

कोपरगाव, (प्रतिनिधी): मोठेबाबा यात्राेत्सवात बॅंजो लावला नाही, मंदिराची स्वच्छता चांगली केले नाही, या कारणावरून मध्यरात्रीला दहा ते पंधरा समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी मोठे बाबा मच्छिंद्रनाथ हे ऐतिहासिक मंदिर असून सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोठेबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी झाली होती, परंतु गावातील समाजकंटकांनी मध्यरात्रीला सरपंचांच्या घरी जाऊन यात्रा उत्सवामध्ये बॅंजो लावला नाही.
मोठेबाबा मंदिराची स्वच्छता चांगली केले नाही, हे निमित्त साधून मध्यरात्रीला दहा ते पंधरा समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठमोठ्याने ओरडून शिवराळ व अश्लील भाषेत दमबाजी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
मला सरपंचपदाची संधी दिल्याने मी गावाचा विकास करू शकले हे विकास कामे काही समाजकंटकांना जिव्हारी लागत असल्याने मध्यरात्रीला १० ते १५ जणांच्या टोळक्याने आमच्या घरी येऊन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याने आमचे घरावर भ्याड हल्ला करण्यात आल्याचे कोळगावथडी ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांनी सांगितले.
सरपंच गवळी म्हणाल्या, यात्राउत्सव कमिटीमध्ये माझे पती चंद्रशेखर गवळी खजिनदार आहे म्हणून त्यांचे अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली. तू यात्रा उत्सव समितीचा खजिनदार आहे, तुला समजले नाही का बॅंजो लावायचा, आम्हाला नाचायचं आहे. तुझी बायको लय शायनिंग मारते , या गोष्टी महागात पडतील, अशी दमबाजी केली. मोठे बाबा यात्रा उत्सव कमिटीचे व देवस्थानचे फ्लेक्स बोर्ड फाडून त्यांची विटंबना करण्यात आली.
आमच्या जीविताला धोका असून तसेच कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी सरपंच गवळी यांनी केली. घटनास्थळी कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार गजानन दांडेकर, पोलीस नाईक किसन सानप आदींनी भेट दिली. समाजकंटकावर कडक कारवाई करण्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले असून, गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
यात्रोत्सवाचे फ्लेक्स बोर्ड फाडणे, मध्यरात्रीला महिला सरपंच यांच्या घरी १० ते १५ समाजकंटक जाऊन यात्रा उत्सवात समस्याचे राहिल्याचे कारण सांगून अश्लील भाषा वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी देतात.
गावाचा व मोठेबाबा यात्राेत्सवाचा शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर वेळीच बंधने घातले नाही तर ते उद्या कायदा हातात घेऊन मोठा गुन्हा घडवू शकतात, ही शक्यता नाकारता येत नसल्याने या समाज कंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. कांचन राऊत पोलीस पाटील, कोळगावथडी





