कामशेत : मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिला सरपंच पदावर आरूढ झाल्या आहेत. परंतु, काही अपवाद वगळता तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत जिथे महिला सरपंच आहेत, तिथल्या गाव कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप वाढत चाललेला दिसत आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला असला तरीही तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतींचा कारभार हा सरपंचपती चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास पन्नास टक्के गावात ‘महिला’ सरपंच आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्रासपणे लुडबुड करताना दिसतात. तालुक्यात नव्हे तर राज्यातही असे अनेक प्रकार पुढे आले होते. त्यामुळे राज्य शासनाने एक आदेश काढून महिला सरपंचांच्या कामात पती अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप चालणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु, आजही अनेक गावात महिला सरपंचांच्या अधिकारावर गदा आणून पतीराजांचा राजरोसपणे हस्तक्षेप सुरू असल्याचे दिसते. परिणामी मावळातही ‘महिला सरपंच नावाला आणि पती गाव कारभाराला’ अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. अनेक ग्रामपंचायतीत सरपंच मॅडमचे पती हे कर्मचार्यांना दमदाटी करणे, बारीक बारीक चुका काढून टोमणे मारणे, दबाव टाकून टेंडर मिळविणे किंवा मिळवून देणे असे प्रकार करताना दिसतात. बीडीओ साहेब लक्ष देतील काय? वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक यांनी खरे तर याबाबत सरपंच महिलांच्या पती व नातलगांना समज देणे आवश्यक आहे. परंतु काही ग्रामपंचायतीत महिला सरपंच असलेल्या ठिकाणी ग्रामसेवकही सरपंचपतीचे आदेश पाळताना दिसतात. जेव्हा सरपंच पती मासिक सभेला उपस्थित राहुन अन्य सभासद, कर्मचारी यांच्याशी उद्धटपणे वागतात किंवा कर्मचार्यांवर अरेरावी करतात, तेव्हा तिथे ग्रामसेवक अडविताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे तालुक्यातील या गंभीर प्रकारांवर गटविकास अधिकारी लक्ष देणार की नाही, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. काही अपवाद वगळता जवळपास महिला सरपंच असलेल्या सर्व गावांत हीच परिस्थिती असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे बीडीओ साहेबांनी यात स्वतः लक्ष घावून संविधानाने महिलांच्या हाती दिलेला कारभार महिलाच करतील हे पाहणे आवश्यक आहे. शासनाच्या आदेशाला केराची टोपली सरपंचांचा त्यांच्या गावात एक मान सन्मान व वेगळाच तोरा असतो. मात्र, महिला सरपंच असलेल्या गावांत बर्याचदा महिलेचे पती म्हणजे सरपंचपती व जवळचे नातलग, दीर, सासरे यांचाच तोरा बघायला मिळतो. मुळात सरपंचाच्या खुर्चीवर त्यांच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार सरपंच पती किंवा नातलगांना नसतो, परंतु अनेक ठिकाणी ह्या नियमाला केराची टोपली दाखविली जाते. सरकारी आदेशही डावलला जातो. अनेकदा मासिक सभेला ग्रामसभेला महिले ऐवजी तिचे पतीच उपस्थित राहतात. फक्त सरपंच महिला नाही, तर सदस्य महिलांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे.