MI vs RCB : नॅट सायव्हर-ब्रंटचा ऐतिहासिक ‘धडाका’! WPL मधील पहिल्या शतकासह मुंबईचा आरसीबीवर दिमाखदार विजय
MI vs RCB : बई इंडियन्सने टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) १५ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली आहे.

MI vs RCB Mumbai Indians won by 15 runs : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) १५ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली आहे. वडोदरा येथील कोटांबी बीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईची स्टार ऑलराउंडर नॅट सायव्हर-ब्रंट हिने ऐतिहासिक शतक झळकावून डब्ल्यूपीएलच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात केली.
नॅट सायव्हर-ब्रंटचे रेकॉर्डब्रेक शतक –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. या डावाचे मुख्य आकर्षण ठरली ती नॅट सायव्हर-ब्रंट. तिने अवघ्या ५७ चेंडूत नाबाद १०० धावा कुटल्या. डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील हे पहिलेवहिले शतक आहे. आपल्या या स्फोटक खेळीत तिने १६ चौकार आणि १ षटकार लगावत सोफी डिव्हाईनचा ९९ धावांचा जुना विक्रम मोडीत काढला.
आरसीबीची खराब सुरुवात आणि ऋचाचा एकाकी झुंज –
Back to winning ways! 💙
Defending champions @mipaltan clinch an entertaining contest and jump to 2⃣nd spot on the points table 👏
Scorecard ▶️ https://t.co/yUHXkzVIZw #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvMI pic.twitter.com/6PUhD291CY
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 26, 2026
२०० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात अत्यंत खराब झाली. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे केवळ ३१ धावांत आरसीबीने आपले ४ महत्त्वाचे फलंदाज गमावले. मधल्या फळीत नादिन डी क्लर्क (२८) हिने थोडा वेळ साथ दिली, पण तीदेखील १२ व्या षटकात बाद झाली.
मुंबई इंडियन्सने वडोदरा येथे आरसीबीचा १५ धावांनी पराभव केला.
आरसीबीकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने एकतर्फी झुंज दिली. ऋचाने अवघ्या ५० चेंडूत ९० धावांची तुफानी खेळी केली. तिने आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने आरसीबीला २० षटकांत ९ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मुंबई इंडियन्सची प्रबळ दावेदारी –
या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर (२६ जानेवारी) मिळालेला हा विजय आणि सायव्हर-ब्रंटचे ऐतिहासिक शतक मुंबईच्या चाहत्यांसाठी दुहेरी आनंद घेऊन आले आहे.





