Mhaswad Temperature : म्हसवडचा पारा ४१ अंशावर! निसर्गाने करून दिली लॉकडाऊनची आठवण; जनजीवन विस्कळीत
Mhaswad Temperature : माण तालुक्यात उन्हाचा कहर; म्हसवड शहराचे तापमान ४१ अंशांवर पोहोचल्याने मुख्य बाजारपेठांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट.

Mhaswad Temperature – माण तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला असून म्हसवड शहरातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णतेमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते, बाजारपेठा आणि चौक ओस पडलेले दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये “निसर्गाने पुन्हा एकदा लॉकडाऊनची आठवण करून दिली” अशी भावना व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील टोकावर असलेला माण तालुका हा पूर्वीपासूनच अवर्षणग्रस्त आणि उष्ण हवामानासाठी ओळखला जातो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर हे थंड हवेचे पर्यटनस्थळ असताना, पूर्वेकडील माण तालुका मात्र दरवर्षी तीव्र उष्णतेचा सामना करत असतो. यंदा मात्र उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढल्याने तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे.
म्हसवड शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दुपारी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रखर उन्हामुळे दुपारच्या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी गल्लींमध्ये दुपारच्या सुमारास संचारबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
करोना महामारीदरम्यान २०२० आणि २०२१ मध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जसे रस्ते ओस पडले होते, त्याचप्रमाणे दृश्य सध्या म्हसवड शहरात पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. “उन्हामुळे लोकांनी स्वतःहून घरात राहणे पसंत केले आहे,” अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे माण तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले असून पावसाच्या प्रतीक्षेत सर्वांचे डोळे लागले आहेत.





