Mhaswad Water Supply : म्हसवडकरांची तहान भागणार! २७ किमीवरून पाणी पोहोचलं; मंत्री जयकुमार गोरेंनी केली पाहणी
Mhaswad Water Supply : ७९.११ कोटींच्या 'अमृत २.०' योजनेअंतर्गत जलवाहिनीची यशस्वी चाचणी; २१५ एचपी पंपाद्वारे कारखेल केंद्रापर्यंत पोहोचले पाणी.

Mhaswad Water Supply – केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत 2.0’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या म्हसवड शहर पाणीपुरवठा योजनेच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला यश आले असून, कन्हेर-इस्लामपूर (ता. माळशिरस) येथील नीरा उजवा कालवा परिसरातील साठवण तलावातून कारखेल (ता. माण) येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीच्या यशस्वी चाचणीची पाहणी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
या योजनेंअंतर्गत 215 एचपी क्षमतेच्या पंपाद्वारे पाणी उचलून सुमारे 27 किलोमीटर अंतरावरील कारखेल येथील 4.5 एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. या दरम्यान जलवाहिनीचे टेस्टिंग यशस्वीरीत्या पार पडले असून पाणी विनाअडथळा फिल्टर टँकपर्यंत पोहोचल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या “प्रत्येक घराला सुरक्षित नळाचे पाणी” या संकल्पनेतून देशभरात अमृत 2.0 अभियान राबविण्यात येत आहे.
म्हसवड शहरासाठी तब्बल 79.11 कोटी रुपयांची 24×7 नळपाणी पुरवठा योजना साकारली जात आहे. म्हसवड शहरासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नीरा उजवा कालव्यातून उचललेले पाणी इस्लामपूर येथील साठवण तलावातून कारखेलपर्यंत आणण्यात आले आहे. कारखेल येथे उभारण्यात आलेल्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून, त्याची क्षमता साडेतीन एमएलटी आहे.
यापूर्वीच्या जुन्या केंद्राची क्षमता अडीच एमएलटी असल्याने शहरासाठी एकूण सुमारे सहा एमएलटी पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेच्या कामाचा आढावा घेतला व कामाची गुणवत्ता टिकवून निर्धारित वेळेत योजना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहराच्या पाणीप्रश्नावर ही योजना कायमस्वरूपी उपाय ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
24 तास पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
या केंद्रात शुद्ध करण्यात आलेले पाणी लवकरच म्हसवड शहरातील माळशिरस चौक, शिक्षक कॉलनी, सिद्धनाथ हायस्कूल परिसर, विरकरवाडी, मसाईवाडी तसेच अन्य भागांतील जलटाक्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भविष्यात नियमित, सुरक्षित व 24 तास पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






