Mhaswad News : म्हसवडमध्ये राजकीय भूकंप! प्रभाकर देशमुखांच्या एका निर्णयाने निवडणुकीचे चित्र पालटणार?

प्रभात वृत्तसेवा
म्हसवड – राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून, म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष आहे. म्हसवडचे नगराध्यक्षद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, इच्छुक महिला उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
म्हसवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माण तालुक्यातील प्रमुख नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत असली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करू शकतात.
देशमुख यांनी अलीकडेच दिवाळी स्नेहमेळावा घेऊन, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. या मेळाव्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे म्हसवड पालिका निवडणूक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी दुरंगी होण्याची शक्यता आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दुसरे नेते अभयसिंह जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्यास, ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत असताना, म्हसवड पालिकेची ही निवडणूक स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील राजकीय भवितव्य ठरवणारी असेल, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.





