पिंपरी | पालखी सोहळ्यासाठी मेट्रोच्या कामाला ब्रेक पालिकेकडून मेट्रोला काम थांबवण्याच्या सूचना

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारिकरणाच्या प्रलंबित कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. पिंपरी ते निगडी, भक्ती-शक्ती चौकापर्यंत खोदकामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गातील भूगर्भ स्तरांचे परीक्षण (सॉईल टेस्टींग) केले जात आहे. मात्र, २८ जून रोजी देहुतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. २९ व ३० जून रोजी पालखी सोहळा निगडी-दापोडी मार्गाने मार्गस्थ होणार आहे.
या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी मेट्रो व्यवस्थापनाने भूगर्भ परीक्षण कामकाज थांबवून रस्ता मोकळा करावा, असे पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मेट्रोचे महासंचालक श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात मेट्रोच्या खोदकामाला सुरुवात झाली.
भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेट्स लावले आहेत. मेट्रोकडून भक्ती-शक्तीसह मेट्रोच्या प्रत्येक पिलरला भूगर्भ परीक्षण करण्यास चिंचवड ते निगडी मार्गावर लॉग बोअर घेतले जात आहेत. चिंचवड ते निगडी दरम्यान ८१ ठिकाणी लॉग बोअर घेतले जात आहेत. त्यानंतर कामाचा ले-आऊट तयार करण्यात येणार आहे.
मेट्रोच्या खोदकामामुळे वाहतूक पोलिसांनी चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल ते भक्ती-शक्ती चौक निगडीपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. या बदलामुळे वाहतुकीचा भार इतर रस्त्यांवर आल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वाहनांची कायमच वर्दळ असते. नियमित वाहतूक, मुंबईकडे जाणा-या एसटी तसेच खासगी वाहनांची त्यात अधीक भर असते. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. देहूतून २८ जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा महापालिका प्रशासनाकडून देण्यात येतात. तसेच, यंदा संत तुकाराम महाराज यांची पालखी २९ आणि ३० जूनला निगडी ते दापोडी मार्गावरून जात आहे. मेट्रोच्या कामाचा पालखी सोहळ्याला अडथळा होणार आहे.
याबाबत पालिकेकडून मेट्रो प्रशासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व कामे २५ जूनपासून बंद करावीत. निगडी ते दापोडी रस्ता पूर्ववत खुला करावा, असे आयुक्त सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.
वाहतूक बंद ठेवावी लागणार
मेट्रोच्या कामासाठी पोलिसांकडून वाहतुकीत बदल केले आहेत. निगडीत एसटीचा थांबा आहे. एसटी बसेस टिळक चौकातून जातात. भक्ती-शक्ती चौकाकडून येणारी जड, अवजड वाहने टिळक चौकाकडे न जाता भक्ती-शक्ती सर्कल येथून अंकुश चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर, थरमॅक्स चौकातून वळवण्यात आली आहेत.
तर, भक्ती-शक्ती चौकाकडून येणाऱ्या लक्झरी बसेस टिळक चौकाकडून खंडोबा माळ चौकाकडे न जाता भेळ चौक-संभाजी चौक मार्गे जाणार आहेत.
त्यामुळे या मार्गावर कोंडी होत आहे. तर, दुर्गानगर चौकाकडून येणारी जड अवजड वाहने डावीकडून खंडोबा माळ चौकाकडे न वळता सरळ भेळ चौक, संभाजीनगर चौकातून जाणार आहेत. टिळक चौकातून काळभोरनगर अंडरपासमार्गे पुढे बीआरटीमधून वाहने जात आहेत.





