नवदुर्गा – कर्तुत्वाचा जागर: दोन मेट्रो मार्गांची जबाबदारी समर्थपणे पेलणारी ‘स्त्रीशक्ती’
Navadurga: ट्रेन पायलट ते कंट्रोलरपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी

पिंपरी – आजची महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाही, तर तंत्रज्ञान, वाहतूक आणि व्यवस्थापनासारख्या आव्हानात्मक क्षेत्रांतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. मेट्रोसारख्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रवास याच स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
दोन मेट्रो मार्गांच्या संचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला कंट्रोलरचा प्रवास अनेक महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे. ही कहाणी आहे मेट्रोचे सारथ्य करणाऱ्या पूजा काळे यांची.
मेट्रोमधून दररोज हजारो प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करतात. या प्रवासामागे ट्रेन पायलट्सची महत्त्वाची भूमिका असते. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या पूजा सुरेश काळे यांनी आपल्या अनुभवाच्या बळावर आता क्रू कंट्रोलर म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे. मेट्रोमध्ये साडेतीन वर्षांचा अनुभव, त्यापैकी तीन वर्षे ट्रेन पायलट म्हणून काम आणि त्यानंतर पदोन्नती असा त्यांचा प्रवास आहे.
पूजा काळे यांचा प्रवास नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण
ट्रेन चालविण्यापासून ते संपूर्ण ट्रेन पायलट टीमच्या ड्युटीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी सांभाळणाऱ्या पूजा काळे यांचा प्रवास नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. एप्रिलमध्ये पदोन्नती झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या मेहनतीचा अभिमान वाटत असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत, शिस्त आणि सातत्य राखत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधत प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या प्रवासात कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ही पदोन्नती म्हणजे केवळ पदातील वाढ नसून, आजवर घेतलेल्या मेहनतीची आणि पार पाडलेल्या जबाबदारीची पोचपावती आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. लाईन १ आणि लाईन २ या दोन्ही लाईन्समध्ये खूप फरक आहे.
एक लाईन एलिव्हेटेड म्हणजे उंच पुलावरून जाते, तर दुसरी अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखालून जाते. त्यामुळे दोन्ही लाईन्सवर काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. पण स्वतःवरचा विश्वास, योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता आणि काम शिकण्याची तयारी यामुळे त्यांचे काम त्या व्यवस्थित पार पाडतात.
‘स्त्रीशक्ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडणे. दोन मेट्रो मार्गांच्या संचालनाची जबाबदारी सांभाळणे आणि गरज पडल्यास प्रत्यक्ष मेट्रो चालवणे, हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवू शकते.
माझा विश्वास आहे की, स्त्रीला संधी मिळाली आणि तिने स्वतःवर विश्वास ठेवला, तर ती कोणतीही जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते. माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे स्वतः यशस्वी होण्यासोबतच इतर महिलांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणे.’ – पूजा काळे, क्रू कंट्रोलर, महामेट्रो.
Satara: नाना पाटेकर यांना सातारच्या रंगकर्मींच्यावतीने श्रद्धांजली





