Metal In Coke | विमानाच्या शितपेयात धातूचा तुकडा! डाएट कोकमधून धातू गिळला ; व्यावसायिक रुग्णालयात दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्पाईस जेटच्या विमानाने गोवा ते पुणे प्रवास करत असताना एका व्यावसायिकास विमानात दिलेल्या शीतपेयात धातूचे तुकडे आढळले. व्यावसायिक अभिजित भोसले ८ सप्टेंबर रोजी गोव्याला निघाले असताना त्यांनी एक डाएट कोकचा कॅन घेतला. कॅनमधील शितपेय पित असताना शितपेयातून एक धातूचा तुकडा त्यांच्या घशात उतरला, त्यामुळे घशाला इजा झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. भोसले पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
उपचारानंतर याबद्दल नागरी विमान वाहतूक मंत्रालय, कोकाकोला इंडिया, स्पाइसजेट, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे भोसले यांनी सांगितले. विमानातील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने कॅनचा ताबा घेत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. याबाबत विमान कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
कॅनमध्ये धातुचा तुकडा सापडण्याच्या घटनेबद्दल कोका-कोला कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आले असून संबंधित ग्राहकाशी संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षितता आणि गुणवत्ता ही कोकाकोलासाठी सर्वोच्च स्थानी असून शितपेय भरताना कोणतीही वस्तू त्यात जाणार नाही, याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.





