Hardeep Singh Puri: ‘एपस्टाईनला फक्त 3-4 वेळा भेटलो, तो ही शिष्टमंडळाचा भाग म्हणून’; राहुल गांधींच्या आरोपांना हरदीप सिंग पुरींचे प्रत्युत्तर
Hardeep Singh Puri On Rahul Gandhi:

Hardeep Singh Puri On Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुप्रसिद्ध ‘एपस्टाईन फाईल्स’शी आपला संबंध जोडण्याचे राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत, पुरी यांनी स्पष्ट केले की त्यांची जेफ्री एपस्टाईनशी झालेली भेट ही केवळ ‘इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट’च्या (IPI) शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून होती आणि त्याचा एपस्टाईनच्या गुन्हेगारी कृत्यांशी कोणताही संबंध नाही.
व्यावसायिक भेटींचा संदर्भ –
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “मी जेव्हा आयपीआय (IPI) अंतर्गत एका कमिशनमध्ये काम करत होतो, तेव्हा माझे वरिष्ठ टेर्जे रॉड-लार्सेन हे एपस्टाईनला ओळखत होते. त्यांच्यामार्फतच माझी एपस्टाईनशी जास्तीत जास्त ३ ते ४ वेळा भेट झाली. या भेटी केवळ व्यावसायिक स्वरूपाच्या होत्या. २००९ ते २०१७ या आठ वर्षांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या लाखो ईमेल्सपैकी केवळ दोन ते तीन वेळाच माझा उल्लेख आहे, तो ही केवळ आंतरराष्ट्रीय कामाच्या संदर्भात.”
‘एपस्टाईन मला दांभिक म्हणायचा’ –
राहुल गांधींना टोला लगावताना पुरी म्हणाले की, “राहुल गांधींनी ते ईमेल्स नीट वाचले पाहिजेत. २०१४ मधील एका संवादात एपस्टाईनने मला ‘टू-फेस्ड’ (दोन तोंडी) म्हटले होते, कारण मला त्याच्या कामात रस नव्हता. त्यांच्यासाठी मी ‘योग्य माणूस’ नव्हतो. एपस्टाईन फाईल्स या लैंगिक गुन्हे, पीडोफेलिया आणि एका बेटावर चालणाऱ्या गैरप्रकारांबद्दल आहेत. माझा या प्रकरणांशी दुरान्वयेही संबंध नाही.”
ईमेलमधील मजकुराचा दाखला –
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ पुरी यांनी एका ईमेलचा संदर्भ दिला, जो लिंक्डइनचे माजी प्रमुख रीड हॉफमन यांना पाठवण्यात आला होता. “त्या ईमेलमध्ये मी भारताच्या इंटरनेट क्रांतीबद्दल आणि आर्थिक संधींबद्दल चर्चा करत होतो. एपस्टाईनला तो ईमेल केवळ ‘सीसी’ करण्यात आला होता. मी भारताच्या वाढत्या इंटरनेट वापरकर्त्यांबद्दल आणि जागतिक संधींबद्दल बोलत होतो, जे माझे अधिकृत कर्तव्य होते,” असे पुरी यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हरदीप सिंग पुरी यांचे नाव ‘एपस्टाईन फाईल्स’मध्ये असल्याचा दावा केला होता. या फाईल्समध्ये अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टाईनच्या सामाजिक वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांचा आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. एपस्टाईनवर लैंगिक तस्करीचे गंभीर आरोप होते आणि २०१९ मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता.





