Melbourne Test : आघाडीच्या फळीचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय – इयान हिली

IND vs AUS 4th Test :- ब्रिस्बेन येथील लढतीच्या दुसऱ्या डावामध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला उध्वस्त केले होते. यामध्ये नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाज़ा व मर्नास लॅबूशेन या तिघांना बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेत विशेष कामगिरी करता आलेली नाही. आघाडीची फळी लवकर उध्वस्त होत असल्याने याचा दबाव मध्यफळीवर येत आहे. त्यामुळे 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या आघाडीच्या फळीचा फॉर्म हा चिंतेचा विषय असल्याचे सांगताना, यांनी आपल्या मूलभूत गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला, अनुभवी यष्टीरक्षक इयान हिली यांनी दिला.
ब्रिस्बेन कसोटीमध्ये आघाडीची फळी लवकर बाद झाली होती. त्यानंतर मधल्या फळीतील ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ यांना लवकर फलंदाजीसाठी यावे लागले. दोन्ही फलंदाजानी दमदार फलंदाजी करताना आपली शतके झळकावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभारता आला होता. मात्र दुसऱ्या डावात पुन्हा भारताच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीची फळी कोसळली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ७ बाद ८९ असा गडगडला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने डाव झटपट घोषित करताना भारताला विजयासाठी २७५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने बिनबाद ८ अशी सुरुवात केल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि कसोटी अनिर्णित राहिली. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
सेन रेडियोशी बोलताना हिली म्हणाले, मला वाटत नाही की, मेलबर्न कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघावर दबाव असेल. मात्र, त्याची आघाडीची फळी ही फॉर्ममध्ये नाही हे मान्य करावेच लागणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मॅकस्विनी, ख्वाज़ा व लॅबूशेन हे सध्याच्या घडीला धावा करण्यासाठी झगडत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले, निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी विचारले पाहिजे की, हे तीन फलंदाज फॉर्म मध्ये परत येऊ शकतील की नाही ? त्याच्यावर बेली यांना विश्वास आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
फॉर्ममध्ये येण्यासाठी मेलबर्न कसोटी सर्वोत्तम…
तीनही फलंदाजाना फॉर्ममध्ये येण्यासाठी मेलबर्न कसोटी सामना ही सर्वोत्तम संधी असलयाचे त्यांनी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मेलबर्न येथील खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजाना मदत करणारी आहे. यापूर्वी देखील या मैदानावरील लढती चांगल्या झाल्या आहेत. फॉर्म मध्ये परतायचे असेल तर मेलबर्न कसोटी ही सर्वोत्तम संधी असणार आहे. मात्र यासाठी त्यांनी आपल्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे देखील हिली बोलताना म्हणाले.





