World Cup 2027 : एकदिवसीय विश्वचषकासाठी कर्णधाराची घोषणा! ‘या’ खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आतापासूनच क्रिकेट विश्वात हालचाली सुरू झाल्या आहेत.

Mehidy Hasan Miraz Bangladesh Captain for World Cup 2027 : आगामी २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बांगलादेशने आपल्या नेतृत्वात स्थिरता आणण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराझ हा २०२७ च्या विश्वचषकापर्यंत संघाचे नेतृत्व करेल. कप्तानाला दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाल्यास संघ अधिक मजबूत होतो, या विश्वासाने बोर्डाने मिराझवर हा विश्वास दाखवला आहे.
मिराझचा यशस्वी कार्यकाळ –
मेहदी हसन मिराझची गेल्या वर्षी एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ऑक्टोबर २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि मार्च २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स चेअरमन नजमुल आबेदीन यांनी सांगितले की, मिराझ गेल्या एका वर्षापासून उत्कृष्टनेतृत्व करत असून, विश्वचषकापूर्वी त्याला पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.
२०२८ टी-२० विश्वचषकाची धुरा कोणाकडे?
केवळ एकदिवसीयच नव्हे, तर टी-२० फॉरमॅटसाठीही बांगलादेशने आपले पत्ते उघडले आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दास २०२८ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत बांगलादेशच्या टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे. वास्तविक पाहता, लिटनची नियुक्ती २०२६ च्या विश्वचषकापर्यंतच होती, परंतु सुरक्षा कारणास्तव बांगलादेशने भारतात होणाऱ्या २०२६ च्या स्पर्धेतून माघार घेतल्याने आता त्याची मुदत २०२८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासोबतच, फिरकी गोलंदाजी मजबूत करण्यासाठी बांगलादेशने माजी फिरकीपटू मोहम्मद रफीक यांची एक वर्षासाठी ‘स्पिन-बॉलिंग कन्सल्टंट’ म्हणून नियुक्ती केली आहे.





