प्रभात वृत्तसेवा खालापूर – आधुनिकतेच्या आणि शिक्षणाच्या युगात आजही काही समाजघटक विकासाच्या परिघाबाहेर आहेत, याची जिवंत साक्ष खोपोली बाजारपेठेत पाहायला मिळाली. डोंबारी समाजातील लहानग्यांनी पोटासाठी, कुटुंबासाठी तारेवरची कसरत करत केलेली जीवघेणी प्रात्यक्षिके पाहून अनेकांनी विचार करण्यास भाग पाडले.जन्माचे ठिकाण नाही, घराचा पत्ता नाही, ओळख नाही आणि आधारही नाही. अशा परिस्थितीत जगणारा हा समाज केवळ कसरती आणि नाच-गाण्यावर उदरनिर्वाह करतो. शिक्षणाचा गंधही नसलेल्या या मुलांना रोज तारेवर चालणे, काठीवर तोल सांभाळणे, उंचावरचे खेळ सादर करणे भाग असते. त्यांच्या कसरतीत त्यांच्या कौशल्यापेक्षा गरज आणि जगण्याची तडफड अधिक दिसून येत होती.खोपोली बाजारपेठेत पाच ते दहा वर्षे वयोगटातील कोवळ्या मुलांना तारेवर चालताना, उंच काठ्यांवर खेळ करताना पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. शासन शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना, या मुलांचे वास्तव मात्र अत्यंत वेगळे आणि हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी या चिमुकल्यांच्या धोकादायक कसरतीवर अवलंबून आहे.डोंबारी समाजातील पुरुष-महिला रस्त्याच्या कडेला, बाजारपेठेत आपली पारंपरिक कला सादर करतात. नाच, ढोल-ताशांचा ताल आणि धोकादायक कसरती यांच्या संगमातून हा समाज लोकांचे मनोरंजन करतो. दिवसाच्या शेवटी लोकांनी दिलेल्या पैशातूनच त्यांच्या ताटात भाकरी येते. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे जगाच्या नजरेत छोटं असलं तरी त्यांच्यासाठी मोठं यश असतं.लहान मुलांनी जीव धोक्यात घालून केलेल्या खेळांमागे त्यांचे बालपण कुठेतरी हरवून गेले आहे. खेळ दाखवतानाची त्यांच्या मनातली भीती, नंतर मिळणाऱ्या पैशांवर दिसणारा आनंद आणि कुटुंबाच्या डोळ्यातला आशेचा किरण, हे दृश्य बाजारपेठेत उपस्थित असलेल्या नागरिकांना अंतर्मुख करून गेले. विकासाच्या यात्रेपासून हा समाज अजूनही खुप दूर आहे, त्यामुळे शासनाची मदत आणि सुविधा या समाजापर्यंत पोहोचण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आले.