India-Pakistan : भारत-पाकमध्ये मध्यस्थीला स्वारस्य नाही.! अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे स्पष्टिकरण

India-Pakistan – काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा थेट मुद्दा आहे. दक्षिण आशियातील दोन शेजारी देशांमध्ये मध्यस्थी करण्यास अमेरिकेला काहीही स्वारस्य नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील थेट मुद्दा असल्याचे अमेरिकेचे दीर्घकाळापासूनचे धोरण आहे. जर अमेरिकेला कोणत्याही मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची विनंती केली गेली, तर त्यासाठी अमेरिकेची तयारी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सध्या सोडवण्याची गरज असलेल्या अनेक समस्या आहेत.
आम्ही काश्मीरची समस्या सोडवण्याचे काम आम्ही भारत आणि पाकिस्तानवरच सोडत आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांबरोबरच्या वार्तालापादरम्यान म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भाषणादरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा दावा केला होता. या दाव्यावर अधिकाऱ्याने स्पष्टिकरणही दिले आहे. हा दावा खरा आहे. अमेरिका या संघर्षामध्ये पडली होती आणि युद्धबंदीसाठी अमेरिकेने पुर्णपणे मध्यस्थी केली होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानबरोबर दहशतवादासारख्या मुद्द्यांवरील चर्चेमध्ये अन्य कोणत्याही त्रयस्थाच्या मध्यस्थीची आवश्यकता नसल्याची भूमिका भारताने पहिल्यापासून कायम ठेवली आहे. हे मुद्दे द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवले जायला पाहिजे, असे भारताने नेहमीच म्हटले आहे.





