MD Drugs Case : शिरूरमध्ये खळबळ! सोने मोजण्याच्या वजन काट्याचा वापर एमडी ड्रग्ज मोजण्यासाठी?
MD Drugs Case : मौल्यवान रत्ने आणि सोने मोजण्यासाठी वापरले जाणारे पॉकेट काटे तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी; व्यापाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण.

MD Drugs Case – पुणे जिल्ह्यासह राज्यभरात थैमान घालणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थाचे सावट शिरूर शहर आणि तालुक्यावर गिरक्या घालत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ज्या डिजिटल पॉकेट वजन काट्यांचा वापर सामान्यतः सोने-चांदी, मौल्यवान दागिने किंवा रत्नांचे वजन मोजण्यासाठी केला जातो, तेच काटे आता ड्रग्ज मोजण्यासाठी वापरले जात असल्याची चर्चा शिरूरमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, शहरातील एका छोट्या इलेक्ट्रॉनिक दुकानातुन अवघ्या काही दिवसांत तब्बल ५० ते ६० डिजिटल वजन काट्यांची विक्री झाल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर शहरातील काही इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये २० ते २५ वयोगटातील तरुणांची वर्दळ अचानक वाढली असून हे तरूण विशेषतः ‘डिजिटल पॉकेट स्केल’ची मागणी करत आहेत.
सुरुवातीला ही नियमित विक्री असल्याचे दुकानदारांना वाटले. मात्र अल्पवयीन व तरुण मुलांकडून मोठ्या प्रमाणावर एकाच प्रकारचे वजन काटे खरेदी होऊ लागल्यानंतर व्यापाऱ्यांनाही संशय येऊ लागला आहे. सोन्याचे वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे काटे एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांकडे का जात आहेत, हा प्रश्न आता शिरुरकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
मिलीग्रॅममध्ये चालतो ‘मौत का कारोबार’
‘एमडी ड्रग्ज’ ची विक्री ही अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ग्रॅम आणि मिलीग्रॅममध्ये केली जाते. या अंमली पदार्थाची किंमत लाखोंमध्ये असल्याने त्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी डिजिटल पॉकेट स्केलचा वापर केला जातो. त्यामुळे शिरुरमध्ये अशा काट्यांची अचानक वाढलेली विक्री ही केवळ योगायोग नसून, त्यामागे ड्रग्जच्या वाढत्या अवैध व्यवहाराचे मोठे जाळे सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
शिरूर तालुक्यातील युवक झालेत व्यसनाधीन
सुत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातून ग्रामीण भागात एमडी ड्रग्जचे जाळे झपाट्याने पसरत असून, शिरूर तालुक्यातील काही भाग ‘सेफ झोन’ म्हणून वापरले जात असल्याचीही चर्चा आहे. गावोगावी बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या धंद्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
नेमके कोण चालवत आहे हे रॅकेट?
शिरूर शहरात आणि तालुक्यात अचानक वाढलेली संशयास्पद हालचाल पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वजन काटे खरेदी करणारे तरुण नेमके कोण, त्यांच्या मागे कोणते ड्रग्ज पुरवठादार सक्रिय आहेत, शहरात एमडी ड्रग्जचा साठा नक्की कुठून येतो, स्थानिक पातळीवर कोणत्या टोळ्या हे जाळे चालवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व हालचालींकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष तर होत नाही ना, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.




