Shirur Crime: शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी दोन दिवसांत धडक कारवाया करत आठ गुन्हे दाखल केले. या कारवाईत दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांडोह, डोंगरगण, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई व आमदाबाद परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. टाकळी हाजी येथील घोड नदी पात्रालगतच्या काटवनात छापा टाकून २२०० लिटर कच्चे रसायन, ३५० लिटर गावठी दारू व भट्टी साहित्य असा १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाले. मलठण, कवठे येमाई व आमदाबाद येथे देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. डोंगरगण येथे रम्मी जुगार अड्ड्यावरही छापा टाकण्यात आला. पुढेही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे निरीक्षक केंजळे यांनी सांगितले.