eknath shinde | ajit pawar | devendra fadnavis – मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही सोशल मिडीयावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांसाठी पोस्ट करताना अनेक विशेषनांचा वापर केला. त्यामुळे त्यांनी केलेली पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंनी चारोळी देखील पोस्ट केली आहे. “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे… महाराष्ट्राच्या उध्दाराचा, रात्रंदिन हा ध्यास असू दे… सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! अशा शब्दात शिंदेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना, असे म्हटले आहे. शुभेच्छांची देखील रंगली चर्चा विधीमंडळ अधिवेशनात आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे शिंदेसेनेचे शिलेदार अडचणीत आले आहेत, अशी चर्चा आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंनी देखील दिल्लीवारी केली होती. त्यामुळे नक्की शुभेच्छा देताना, त्यांनी पोस्ट केलेल्या चारोळीवरुन राजकिय अर्थ निघत असल्याची चर्चा देखील सोशल मिडीयावर रंगली होती.