Sanjay Raut : अमित शहांच्या मेहरबानीवर गांडूळासारखा जगणारा माणूस; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut on Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शिंदे यांनी विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांनी शिंदेंना “किरकोळ माणूस” संबोधत तीव्र शब्दांत टीका केली. “जो माणूस अमित शहांच्या मेहरबानीवर गांडूळासारखा जगतोय, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नाही,” असा खोचक टोला राऊतांनी लगावला.
याशिवाय, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही मुंबई तोडण्याच्या कथित कारस्थानाचा आरोप करत हल्ला चढवला. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दिलेल्या आव्हानाचे समर्थन करत राऊतांनी भाजपला मराठी माणसाविरुद्ध आव्हान देणारी पक्ष म्हणून हिणवले.
विधिमंडळातील भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, २०१७ मध्ये शिवसेनेला महापौरपद फडणवीसांच्या विनंतीमुळे मिळाले. “एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे फडणवीसांना पुष्पगुच्छ द्यायचा, यांना केमिकल लोचा झाला आहे,” असा टोमणा शिंदे यांनी मारला होता.
याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला. “एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही. हा किरकोळ माणूस आहे. अमित शहांच्या कृपेवर तो गांडूळासारखा जगतोय. त्यांच्या वळवळण्याला आम्ही महत्त्व देत नाही,” असे राऊतांनी ठणकावले. त्यांनी शिंदेंच्या टीकेला “नगण्य” ठरवत त्यांचे राजकीय वजनच कमी असल्याचा दावा केला.
भाजपचाच बाप मुंबई तोडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते की, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे भावनिक नाट्य रचले जाईल, पण “कोणाचाही बाप असो, मुंबई तोडली जाणार नाही.” यावर राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. “भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे.
ही नाटकी भाषा बंद करा. महाराष्ट्र हा नाट्यपंढरी आहे, इथे अनेक नटसम्राट निर्माण झाले आहेत. मुंबई तोडण्याचे कारस्थान व्यापाऱ्यांचे आहे, आणि हे व्यापारी भाजपचे आहेत. त्यांना मुंबईतून फक्त पैशाच्या थैल्या हव्या आहेत. मुंबई कंगाल करायची आहे, आणि सरकार ही लुटमार पाठवते,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
राज ठाकरेंच्या आव्हानाला राऊतांचे समर्थन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान देताना म्हटले होते, दुबे…तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, यावर राऊतांनी ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले. “राज ठाकरेंचे आव्हान फक्त निशिकांत दुबेला नाही, तर संपूर्ण भाजपला आहे. दुबे हा भाजपचा खासदार आहे, आणि त्याच्या मराठी माणसाविरुद्धच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा एकाही भाजप नेत्याने निषेध केला नाही.
शेंबूड पुसल्यासारखी नाराजी व्यक्त करून काय होणार? एक माणूस तिकडून मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला आव्हान देतोय, मारण्याची भाषा करतोय, आणि इथले भाजप आणि शिंदे गटाचे नेते लाचारपणे मान खाली घालून बसले आहेत,” असे राऊतांनी सांगितले.





